महागाव
संरक्षक कठडे नसलेल्या धनोडा पुलावरून ट्रक कोसळला नदी पात्रात
(चालक गंभीर जखमी,सुदैवाने जीवितहानी टळली)
महागाव:-
पैनगंगा नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने भरधाव ट्रक नदीपात्रात कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २८डिसेंबर रोज शनिवार ला सायंकाळी ६वाजताच्या दरम्यान घडली असुन दोन युवकांनी प्रसंगावधान राखत या अपघातातील जखमी ट्रक चालकाचे प्राण वाचविले आहे.
चंद्रपूर येथील सिमेंट कारखान्यातून माहुर मार्गे विदर्भात सिमेंट घेवुन जाणारा भरधाव ट्रक क्र. एम एच ३४एबी ४०२३ हा आज दिनांक २८डिसेंबर रोज शनिवार ला सायंकाळी सहा वाजताच दरम्यान धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावर आला असता त्याची चाके निखळल्याने ट्रक अनियंत्रित होवुन संरक्षक कठडे नसलेल्या पुलावरून जवळपास तीस फुट खोल नदीपात्रात कोसळला. हा अपघात घडल्यानंतर बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या अपघातात ट्रक चालक संतोष यादव राठोड(वय २४वर्ष) रा.भवानी ता.उमरखेड जि.यवतमाळ ट्रकच्या कॅबिन मध्ये अडकुन गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याठिकाणी अपघाताची माहिती मिळताच पोहचलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण जयस्वाल व माहुर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी जेसीबीच्या सहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक मधील जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी माहुर ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु जखमी चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे.
धनोडा येथील पुलाला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी वारंवार केल्या जात असताना संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत असुन भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी या पुलाला तत्काळ संरक्षक कठडे बसविण्यात यावे प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
चौकट
ते दोघे चालकासाठी ठरले देवदुत.
धनोडा येथील पुलावरून नदी पात्रात ट्रक कोसळल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण जयस्वाल व माहुर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी अपघात स्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.त्याठिकाणी नदी पात्रात नव्याने कोल्हापुरी बंधारा बांधकाम प्रगतीपथावर असुन त्या कामाकरीता जेसीबी उपलब्ध होत्या जयस्वाल यांनी संबधित यंत्रणेला जेसीबी देवून अपघातग्रस्त चालकाला वाचविण्याची विनंती केली असता कामावरील देखरेख करणाऱ्या व्यक्तीने जेसीबी देण्यास नकार देत कामात अडथळा आणण्याचा बहाणा करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली .परंतु याला भिक न घालता जयस्वाल व भारती यांनी आक्रमक पावित्रा घेत संबंधित कंत्राटदार व जेसीबी चालकांना चांगलेच फैलावर घेत स्वतः जेसीबी मध्ये बसुन जेसीबी अपघात स्थळी आणून त्याद्वारे अपघात ग्रस्त ट्रक मधील जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले.अपघात घडल्यानंतर बघ्यांच्या गर्दीतील या दोन्ही युवकांनी मदतीसाठी पुढे येवून त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रक चालकाचे प्राण वाचले.