मुंबई: भाजपच्या तीव्र विरोधानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी मनखुर्दमध्ये आयोजित नवाब मलिक यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. तसेच त्यांनी अनुषक्तीनगर मतदारसंघात मलिक यांच्या मुलगी सना मलिक यांच्या प्रचारसभेतही भाग घेतला. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अजित पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला अनुषक्तीनगरमधील गोवंडीच्या टाटा नगर येथून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मनखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली.
अजित पवारांचे वक्तव्य: सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, “नवाब मलिक यांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील. न्यायालयात त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही, ते दोषी ठरलेले नाहीत. म्हणूनच मी त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे.”
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया: माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, “अजित पवार माझ्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडणुकीसाठी तिकीट दिले आणि माझ्या प्रचारसभेत सहभागी झाले. मला त्यांच्याकडून यापेक्षा अधिक काही अपेक्षित नाही.”
या प्रचारसभेला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती आणि नागरिकांनी मलिक आणि पवार यांच्या नेतृत्वाला जोरदार प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे