कधीकधी वाटतं, कधी पुन्हा एकदा माणूस म्हणून जन्माला येईन का, आणि जे शकलो नाही ते करेन का?
मी एक चांगला मुलगा, चांगला पती, चांगला बाप होऊ शकतो का? कारण, अजूनपर्यंत मला हे कळालंच नाही की मी जे काही केलं, त्यात मी खरंच यशस्वी झालो का?
आयुष्यात अनेक वळणं आली, परंतु आता परत जाणं शक्य नाही. या प्रवासात इतकं लांब आलोय की कधी कधी वाटतं, आयुष्याची एक नवीन संधी मिळेल का, जे चुका केल्या त्यांचं परिमार्जन करायला?
कधी वाटतं की, आपण इतर सर्वसामान्य माणसांसारखेच आलो आहोत, आणि काहीच विशेष न करता निघून जाऊ असं होईल का? या विचारात अनेकदा गुरफटून जातो.
सर्व बाजू पाहिल्या, पण जिथं पाहावं तिथं अंधारच दिसतो. कधी कधी वाटतं, या अंधारात प्रकाशाची एक किरण येईल का, आणि हे सगळं संपेल का?
आपल्या मनातलं कुणाला सांगावं हा प्रश्न नेहमी भेडसावतो. कधी कधी वाटतं, या आयुष्याला थोडा विसावा देऊ का?
एकीकडे मोठा कर्जाचा डोंगर आहे, आणि दुसरीकडे आपली बेरोजगारी. त्यातच गुंतून राहिलोय, स्वतःला सापडणार का?
कधीकधी वाटतं, आपल्या चुकांमुळे, आपली बेरोजगारी, आणि कर्जाचा बोजा मुलांना वारसा म्हणून सोडून जाणार नाही ना, म्हणून पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळते.
कधी वाटतं, आपल्या आईवडिलांनी परिस्थिती नसतानाही आपल्याला शिकवलं, आणि आपण काहीही विशेष न करता बेरोजगार राहिलो. पण, मुलांना किमान चांगल्या शाळेत शिकवू शकू का?
असं वाटतं की, सगळ्याच सुशिक्षित बेरोजगारांची दु:ख आपल्यासारखीच असतील. असं सगळ्यांना वाटतं का?
राजन तेले