आजच्या पालकांसाठी एक संदेश
आजकालच्या काळात आपल्या मुलांवर नुसतीच जबाबदारी नसते, तर ते स्वतःची जबाबदारीही चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. ते शिक्षण, करिअर आणि स्वतःच्या आयुष्याचे योग्य नियोजन करत आहेत. त्यामुळे, त्यांनी लग्न लेट करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यामागेही त्यांच्या स्वतःची कारणं असतात.
समाज नेहमीच काही ना काही बोलत राहणार. “लग्न का नाही करत?”, “कधी स्थिर होणार?” अशा प्रश्नांनी पालकांच्या मनावर दबाव आणला जातो. पण हे लक्षात घ्या की तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्याबद्दल चांगली समज आहे. ते जे काही करत आहेत, ते त्यांच्या भविष्यासाठी योग्य ठरत आहे.
समाजाचे विचार आणि टीकाटिप्पणी याकडे दुर्लक्ष करा. समाज नेहमीच बोलत राहील, पण आपल्या मुलांचे निर्णय हे त्यांचे वैयक्तिक असतात, आणि त्यांचा आदर करणे, त्यांना पाठिंबा देणे हेच खरे पालकत्व आहे.
तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा. त्यांचे निर्णय आणि नियोजन चांगल्या भविष्यासाठीच असते. लोक काय म्हणतील या विचारात गुंतण्यापेक्षा आपल्या मुलांना आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित करा. हे लक्षात ठेवा, तुमचा पाठिंबा त्यांच्यासाठी जगातील सर्वांत मोठी शक्ती आहे.
समाजाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा, मुलाच्या भवितव्याचा विचार करा
आपल्या समाजात एक गोष्ट नेहमी दिसून येते, ती म्हणजे इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याची सवय. विशेषतः मुलगा लग्न लेट करत असेल, तर समाज त्यावर टोमणे मारल्याशिवाय राहत नाही. “लग्न का होत नाही?”, “याला कोणी मुलगीच देत नाही काय?”, “काय बिघडलंय?” अशा प्रकारच्या उलटसुलट गोष्टी केल्या जातात. पण हे लक्षात ठेवा, हा समाज तुमच्या मुलाच्या आयुष्याचा किंवा भवितव्याचा विचार कधीच करणार नाही.
तुमचा मुलगा समजदार आहे, त्याला त्याच्या आयुष्याबद्दल पूर्ण जाणीव आहे. तो शिक्षण, करिअर आणि स्थैर्याच्या दिशेने पुढे जात आहे. आजकालचे तरुण निर्णय विचारपूर्वक घेतात. त्यांचं लग्न उशिरा होत असेल, तर त्यामागे त्यांच्या आयुष्याच्या गरजा आणि स्वप्नं आहेत. ते लग्नासाठी योग्य वेळ येईपर्यंत वाट बघतात, आणि त्यात काही चूक नाही.
समाजाने काय बोलावं याचा विचार करून तुम्ही स्वतःच तणाव घेत बसू नका. समाजाचा स्वभावच असतो बोलण्याचा, पण समाज आज आहे, उद्या नाही. तुमच्या मुलाचं आयुष्य मात्र कायमस्वरूपी आहे, आणि त्याच्या आयुष्याचा विचार तुम्हालाच करावा लागेल.
तुमचा मुलगा जो काही निर्णय घेतोय, तो त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी घेतोय. त्याला वेळ द्या, पाठिंबा द्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. समाजाच्या टोमण्यांना महत्त्व देण्यापेक्षा तुमच्या मुलाच्या आनंदाला महत्त्व द्या. कारण शेवटी तुमचं समाधान आणि मुलाचं यशच तुमचं खरं सुख आहे.
प्रशांत खंदारे
9767478472