
वाटद खंडाळा येथे महारक्तदान शिबीर संपन्न
अनंत श्री. विभुषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगतगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम ता. जि.रत्नागिरी ( महाराष्ट्र ) यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच पिठाचे उत्तराधिकारी प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने ४ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याचाच भाग म्हणून स्व -स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत महारक्तदान शिबीर घेण्यात आले. सदर महारक्तदान शिबिराचे उदघाटन प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम यांच्या हस्ते पार पडले.
रक्तदानातुन समाजातील गरजवंतांचे प्राण वाचावे ही जगतगुरू माऊलींची संकल्पना प्रेरणादायी असल्याचे सांगून डॉ. श्रुती कदम यांनी सर्व संप्रदाय समुदायांचे आभार मानले.
या महारक्तदान शिबिरात परिसरातील ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे म्हणुन या सामाजिक कार्यात सहभाग घेतला.